ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचं २५ ऑक्टोबरला दुपारी अडीच वाजता निधन झालं आहे. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते किडनीशी संबंधित आजाराशी झुंज देत होते. त्यांच्या पीए रमेश यांनी माहिती दिली की, सतीश शाह यांनी आज (25 ऑक्टोबर 2025) रोजी सुमारे दुपारी 2.30 वाजता शेवटचा श्वास घेतला. ते 74 वर्षांचे होते.
सतीश शाह यांचा जन्म 25 जून 1951 रोजी मुंबईत झाला होता. ते त्यांच्या कॉमिक आणि अप्रतिम अभिनयासाठी ओळखले जात होते.
ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह दीर्घकाळापासून मनोरंजन क्षेत्रात सक्रिय होते. त्यांनी आपल्या विनोदी शैलीने सर्वांची मनं जिंकली आहेत. ‘जाने भी दो यारों’पासून, ‘कभी हां कभी ना’, ‘डीडीएलजे’, ‘कल हो ना हो’, ‘हम आपके है कौन’ ते अगदी ‘मैं हूं ना’पर्यंत अनेक वेगवेगळ्या आणि मोठ्या बॅनरच्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. सतीश शाह यांनी चित्रपटाबरोबरच टेलिव्हिजन क्षेत्रातही मोठं योगदान दिलं आहे. ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेमुळे त्यांना घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली.
सतीश शाह यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात अरविंद देसाई यांच्या ‘अजीब दास्तान’ या चित्रपटातून केली होती. त्यानंतर ते ‘ये जो जिंदगी है’ सारख्या टीव्ही मालिकेमध्ये दिसले. सतीश शाह यांनी अनेक चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांमधून मोठी संपत्ती कमावली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती सुमारे 5.5 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे.