प्रभाग रचनेच्या घोषणेनंतर प्रक्रियेला गती; निवडणुकीचा बार उडणार ऑक्टोबरमध्ये?

मुंबई – 10 जून रोजी राज्य शासनाने आदेश काढून प्रभाग रचनेबाबत सूचना दिली होती. आता कालावधी कार्यक्रम जाहीर केल्याने येत्या दोन महिन्यात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन निवडणुकीचा पुढील कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार ऑक्टोबर अखेरीस किंवा दिवाळीनंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात उडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेच्या वेळापत्रकानुसार ११ जूनपासून सुरू झालेली प्रभाग रचनेची प्रक्रिया ४ सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली जाईल. त्यानंतर आरक्षण व मतदार यादीचे वेळापत्रक जाहीर होईल आणि सोबतच निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच अनुषंगाने राज्यातील अ ब क ड महापालिका व नगरपरिषद आणि नगरपंचायतीचा प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर सुरू होईल. त्यानंतर छाननी, अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख, मतदान, मतमोजणी व निकाल जाहीर करण्याच्या तारखा आयोग जाहीर करणार आहे. राज्य निवडणूक आयुक्तांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकांना निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने आवश्यक नियोजन व समन्वय करण्याचे आदेश दिले आहेत.