गंगाखेड (प्रतिनिधी):-
शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यामुळे मधल्या काळात पाणीपुरवठा विभागाशी समन्वय साधून मुबलक पाणी देण्याचा प्रयत्न केला होता. तरीही पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरूच ठेवला होता. अखेर आज तब्बल १०० कोटींच्या पाणीपुरवठा पाइपलाइन योजनेचे भूमिपूजन करीत असताना समाधान वाटत आहे. कारण, या पाणी पुरवठा योजनेमुळे गंगाखेडकरांची तहान निश्चित भागेल, असा विश्वास गंगाखेडचे रासप आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केला.
शहरातील नवीन पाणीपुरवठा पाईपलाईन कामाचे भूमिपूजन आ.डॉ.गुट्टे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतगर्त तब्बल १०० कोटी निधी मंजूर करण्यात आल्याने त्यातून हे काम पूर्ण होणार आहे.
पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, या महत्त्वाकांक्षी कामाचा शुभारंभ झाल्यानंतर शहरातील पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. तसेच शहरातील रहिवासी पाण्याच्या संदर्भात परिपूर्ण होतील. यामुळे लहानमोठ्या उद्योगांनाही चालना मिळणार आहे. मागील गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या योजनांमुळ नागरिकांचे पाण्यासाठी मोठे हाल होत होते. परंतु, राज्य शासनाने नव्याने मजूरी दिल्याने हे काम मार्गी लागत आहे.
पाणी टंचाईची समस्या जगभर झपाट्याने वाढत आहे. भविष्यात ती अतिशय धोकादायक रूप धारण करू शकते. तेलासाठी युद्धे आपण पाहिलीत. पण, जलसंकट कायम राहिल्याने किंवा अधिक बिकट झाल्याने येत्या काही वर्षांत पाण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये युद्धे होतील. कदाचित पुढचे महायुद्धही याच मुद्द्यावरून लढविले जाईल, अशी भीती बहुतांश तज्ज्ञांना वाटते. जगभर पाण्याच्या टंचाईमुळे विविध देशांमधील पाणी करारांवर आणि भारतासारख्या देशात अगदी वेगवेगळ्या राज्यांमधील करारांवरही संकटाचे ढग दाटून आले आहेत, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ व्यापारी सुभाष सेठ नळदकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव भोसले, उपसभापती संभाजीराव पोले, संचालक प्रशांत काबरा, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किशनराव भोसले, गोपाळदास तापडीया, मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, रासपचे जिल्हाध्यक्ष ॲड.संदिप आळनुरे, माजी नगरसेवक गोविंद यादव अनिल यानपल्लेवार, बालाजीराव डहाळे, जेष्ठ पत्रकार दगडूसेठ सोमाणी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.