केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 अनुदान दिले जाते. या योजनेच्या पाठपुराव्याद्वारे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना आणखी ₹6,000 वार्षिक अनुदान देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. या दोन्ही योजनांमुळे लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण ₹12,000 अनुदान मिळते.
या राज्यस्तरीय योजनेअंतर्गत आतापर्यंत सहा हप्त्यांचे अनुदान शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहे.
नवीन शासन निर्णयानुसार, सातवा हप्ता एप्रिल 2025 ते जुलै 2025 या कालावधीसाठी दिला जाणार आहे. जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhan mantri Kisan Sanman Nidhi) योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांनाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे.
कृषी विभाग यांच्यातर्फे सातव्या हप्त्याच्या वितरणासाठी शासन निर्णय जारी करण्यात आला असून, लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये अनुदान जमा होणार आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
या सातव्या हप्त्याचा लाभ 92.36 लाख शेतकऱ्यांना मिळणार असून, त्यासाठी एकूण ₹1932.72 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.