’नथ’ – एक सांस्कृतिक आणि सौंदर्यपूर्ण परंपरा

भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री सौंदर्याचे अनेक अलंकार महत्त्वाचे मानले जातात. त्यापैकी एक म्हणजे – नथ. ही एक छोटीशी पण अत्यंत आकर्षक शोभा देणारी नाकात घालायची अलंकारिक वस्तू आहे. नथ ही फक्त सौंदर्यवर्धक अलंकार नसून, ती एक परंपरेची, साजशृंगाराची आणि भावनिक नाळ जोडणारी गोष्ट आहे. नथ ही केवळ पारंपारिक दागिन न राहता आता एक फॅशन झाली आहे. नथीचा  काळानुरूप बदलता चेहरा स्त्रीच्या सौंदर्यात अधिक भर घालतो हे मात्र नक्की.
नथचे सौंदर्यशास्त्र:
नथ ही नुसती नाकात घालायची वस्तू नाही. ती चेहर्‍याला एक आगळंवेगळं तेज देते. नथ घातल्यावर चेहर्‍याचे भाव अधिक खुलून येतात. पारंपरिक पेहरावात, विशेषतः नऊवारी साडी आणि जड दागिन्यांमध्ये नथ ही एक आवश्यक बाब मानली जाते. सण, समारंभ, लग्न किंवा नृत्यप्रस्तुती यांच्यात नथ घातल्याने स्त्रीचे रूप अधिक देखणे व भारदस्त वाटते.
महाराष्ट्रात नथीचे विविध प्रकार प्रचलित आहेत. प्रत्येक नथीची रचना, त्यात वापरलेले मोती, रत्न, कुंचे आणि त्यांची ठेवण वेगळी असते. या नथी मागे एक इतिहास, एक सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि एक स्थानिक ओळख दडलेली असते.
नथ आणि परंपरा:
पूर्वी नथ घालणे हे केवळ सौंदर्यासाठी नसून, एका विशिष्ट वयात किंवा वैवाहिक स्थितीत प्रवेश केल्याचे प्रतीक मानले जात होते. आजही लग्नसमारंभात नववधू नथ घालते ती केवळ परंपरा म्हणून नव्हे तर आपल्या कुटुंबाच्या संस्कृतीचा सन्मान म्हणून.
आजच्या आधुनिक काळातही नथचे आकर्षण तसचे टिकून आहे. फॅशन क्षेत्रात अनेक डिझायनर्सने नथला नवीन रूप दिले आहे – हलकी, स्टायलिश, आणि वेगवेगळ्या पोशाखांशी जुळणारी. बॉलीवूडपासून ते आंतरराष्ट्रीय फॅशन शोपर्यंत नथने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.