मुंबई – बदलेलेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली, आणि आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे या दरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातील काही इतर किरकोळ भागात प्रामुख्याने हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.
राज्यातील बहुतांश भागात मात्र कोरडे हवामान अपेक्षित आहे, ज्यामुळे कमाल तापमानात वाढ होईल. विदर्भात 40 अंशापर्यंत कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे तर मराठवाडा आणि खानदेशात कमाल तापमान 35 ते 40 अंशामध्ये राहील. या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर पडण्याची शक्यता आहे.
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार, राज्यातील हवामानात लक्षणीय बदल होणार असून याचा थेट फायदा खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना होणार आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळाला होता. विशेषतः पूर्वमोसमी पावसामुळे अनेक भागांत शेतीची कामे अडचणीत आली होती.
मात्र, आता हवामान कोरडे राहणार असल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मशागत करण्यास आणि पेरणीपूर्व तयारीसाठी संधी मिळणार आहे. पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, 31 मे पासून 6 जून पर्यंत राज्यात जोराचा वारा वाहणार असून या काळात पावसाची शक्यता नाही. यामुळे या आठवड्यात संपूर्ण राज्यात चांगले सूर्यदर्शन राहील आणि हवामान कोरडे राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन तयार ठेवावी, मशागत पूर्ण करून पेरणीसाठी तयारी करून ठेवावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
7 जूनपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता निर्माण होणार आहे. डख यांच्या म्हणण्यानुसार 7, 8, 9 आणि 10 जून दरम्यान महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये, म्हणजेच पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, खान्देश, कोकण आणि मराठवाडा यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.